पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर या गावी पोलिसांनी फ्रेंडशिप डे निमित्त आयोजित रिफ्रेशर पार्टीत सुमारे ऐंशी-नव्वद विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत पकडले, ही बातमी सर्वच वर्तमानपत्रांत तसेच विविधवाहिन्यांवर दिवसभर दाखविण्यात येत होते. हे सर्व प्रतिष्ठित घरची मुले असल्याचेही सांगितले जात होते. ही पार्टी कशी आयोजित केली, कसे पैसे जमा केले, त्याच प्रकारे कसे ते फार्म हाऊसवर रात्री धिंगाणा घालत होते, याचे सर्व रसभरीत वर्णन सर्वच माध्यमे दाखवीत होती. त्याच प्रकारे आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक वाहिनी त्याचे विश्लेषण करीत होती. त्याच प्रकारे त्यांच्या पालकांनाही सल्ले देताना दिसत होत्या. त्याच प्रकारे पोलिसही अशा थाटात आपल्या प्रतिक्रिया देत होते जसे त्यांनी फार मोठे जागतिक दर्जाचे कार्य केले आहे. त्याच प्रकारे आम्ही कसे कायद्याचे रक्षक आहोत, त्याच प्रकारे हे सर्व प्रतिष्ठितांच्या घरची मुले असली, तरी आम्ही त्यांच्यावर कशी कारवाई केली, याबद्दल सांगत होती; मात्र या विद्यार्थ्यांची यात काही चूक मानायला हरकत नाही. कारण ते सर्वजण एकांतात असलेल्या ठिकाणी कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी ही पार्टी करत होते. त्यामुळे त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही;
मात्र आजही अनेक ठिकाणी एखाद्या समाजातील एखाद्या राष्ट्रपुरुषाची किंवा एखाद्या धर्मातील सणानिमित्त मोठ्या आवाजात डीजे सिस्टिमची भिंत लावून भर रस्त्यावर मद्य पिऊन लोक धिंगाणा घालतात. त्याच प्रकारे या आवाजाचा व या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांच्या दांडगाईचा किती मोठा त्रास लोकांना सहन करावा लागतो, याबद्दल प्रसारमाध्यमेही बोलत नाहीत किंवा पोलिसही कारवाई करताना आठळतात नाहीत. या विद्यार्थ्यांची जशी सर्वच प्रसारमाध्यमांनी मोठी बातमी केली, तशी बातमी या सण-उत्सवांनिमित्त भर रस्त्यावर नशा करून धांगडधिंगा घालणाऱ्यांवर व लोकांना वेठीस धरणाऱ्यांवर कोणी चकारशब्द लिहिताना दिसत नाही किंवा पोलिसांत गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कोणी कार्यवाही केल्याचे आढळत नाही, हे असे का घडते. याचे उत्तर मिळविण्यासाठी पोलिस आणि प्रसारमाध्यमांनीही आपल्या भूमिकांवर पुन्हा विचार करण्याची गरज मला वाटते.